साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचाही नवा अध्याय; देशातील सर्वात मोठा दारुगोळा प्रकल्प उभारला जाणार.


साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचाही नवा अध्याय; देशातील सर्वात मोठा दारुगोळा प्रकल्प उभारला जाणार.

शिर्डी : साईबाबांच्या भक्तीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत आता देशाच्या संरक्षण क्षेत्रालाही मोठी ताकद मिळणार आहे. देशातील सर्वात मोठ्या दारुगोळा आणि संरक्षण उत्पादन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प शिर्डीजवळ उभारला जाणार असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर शिर्डीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
या अत्याधुनिक प्रकल्पात तोफगोळे, ड्रोन, क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) आणि विविध संरक्षण साहित्याचे उत्पादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्याला सलग ३६५ दिवस पुरेल इतका दारुगोळा तयार करण्याची क्षमता या प्रकल्पात असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. देशातील संरक्षण उत्पादनात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आधुनिक युद्धसज्जता निर्माण करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून, अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ancillary उद्योगांनाही चालना मिळणार आहे.
शिर्डी हे आजवर श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जात होते; मात्र आता संरक्षण उत्पादनाच्या माध्यमातून ‘भक्तीसोबत शक्ती’ अशी नवी ओळख निर्माण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडत आहे.

पत्रकार: शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!