मुंबई :पवई परिसरात चुकीच्या समजुतीतून एका निष्पाप भिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद युसूफ या भिकाऱ्याचा रिक्षाचालक समजून धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक उर्फ दिपू वर्मा (रा. बिहार) याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधून अटक केली आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपी दीपक आणि पवई परिसरातील एका रिक्षाचालकामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादादरम्यान रिक्षाचालकाने दीपकला मारहाण केल्याने तो संतप्त झाला होता. त्याचाच बदला घेण्याच्या उद्देशाने दीपक रात्री उशिरा रिक्षा स्टँडवर पोहोचला. तेथे रिक्षामध्ये झोपलेल्या व्यक्तीला त्याने संबंधित रिक्षाचालक समजून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
मात्र, हल्ल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती रिक्षाचालक नसून मोहम्मद युसूफ नावाचा भिकारी होता. चुकीच्या ओळखीमुळे निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखा युनिट-10ने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुजरातमध्ये जाऊन दीपक वर्मा याला ताब्यात घेतले. प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णीसंपर्क : ९८२२५४८४२९










