भोसरी उड्डाण पुलाखाली अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त.


भोसरी उड्डाण पुलाखाली अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
भोसरी प्रतिनिधी: भोसरी परिसरातील उड्डाण पुलाखाली सध्या अनधिकृत टपरी धारक आणि आंबे विक्रेत्यांनी अक्षरशः अतिक्रमण केल्याने नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टपऱ्या, हातगाड्या आणि आंबा विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे अनेक विक्रेत्यांकडून रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. संध्याकाळच्या वेळेत या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना चालण्यासाठीही जागा उरत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अनधिकृत व्यवसायिकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग, खराब फळांचा दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहतूक पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करून पुलाखालील अतिक्रमण हटवावे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पत्रकार: विजय आडसुळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!