विषारी दारूकांडातील दोषींना सोडणार नाही; मंत्री गिरीश महाजन यांचा कडक इशारा
पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या भीषण विषारी दारूकांडात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मंत्री Girish Mahajan यांनी दिला आहे.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच महापालिकेकडून यापूर्वीच प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्री महाजन यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला असून अवैध दारू विक्री साखळीपासून ते संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाईल. “या प्रकरणात कोणताही दोषी वाचणार नाही. मग तो कितीही मोठ्या पदावरील असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यभरातील अवैध दारू अड्ड्यांवर व्यापक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विषारी दारूकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील तपास आणि पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी










