३६५ दिवसांची पाणीपट्टी; प्रत्यक्षात पाणी फक्त १२१ दिवस:-
जि. जळगाव:दि. 17 जून :-जळगाव शहरातील पाणीपुरवठा आणि पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, महानगरपालिकेकडून वर्षभराची पाणीपट्टी आकारली जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना केवळ १२१ दिवसच पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी हा विषय उपस्थित करत नागरिकांना मिळणाऱ्या सेवेनुसारच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी केली आहे.
सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने वर्षभरात सरासरी १२१ दिवसच नळांना पाणी मिळते. मात्र महानगरपालिका संपूर्ण ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “न मिळालेल्या पाण्यासाठी शुल्क आकारणे अन्यायकारक आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात नगरसेविका वैशाली पाटील यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याच्या दिवसांनुसार पाणीपट्टी आकारावी किंवा शहरात नियमित दररोज पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा व्यापक लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार शहरात सुमारे १ लाख ३४ हजार मालमत्ता असून अमृत योजनेअंतर्गत हजारो नवीन पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत. पाणीपट्टीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत असतानाही नागरिकांना अपेक्षित दर्जाचा आणि नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे.
शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणी येणे, वेळेत पाणीपुरवठा न होणे तसेच वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच पाणीपट्टी आकारणीबाबत पारदर्शक आणि न्याय्य धोरण राबविण्याची मागणी जोर धरत आहे.
“जेवढे दिवस पाणी मिळते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारावी किंवा नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा. न मिळालेल्या पाण्याचे शुल्क आकारणे योग्य नाही,” असे नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.









