गाढेगव्हाण हादरलं:घातपाताचा संशय :-
जि.जालना, ता. टेम्भूर्णी:दि. 21 जून :-गाढेगव्हाण ता. जाफ्राबाद येथील 30 वर्षीय तरुण कैलास गुलाब गिरी याचा मृतदेह गावाशेजारील शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत तीन दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह जालना येथे हलवण्यात आला आहे.
आज दुपारच्या सुमारास गुरे चारणाऱ्या एका गुराख्याला शेताकडे जाताना दुर्गंधीचा वास आला. वासाचा शोध घेतल्यावर विहिरीजवळील आडोशाला कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह पडल्याचे त्याच्या लक्षात आले. गुराख्याने तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, बीट अंमलदार राजू डोईफोडे आणि रमेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणी करून मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केल्याने अधिक स्पष्ट अहवालासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जालना येथे पाठवण्यात आला आहे.
कैलास गिरी तीन दिवसांपासून बेपत्ता होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि विहिरीजवळ आढळल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “त्याचा कोणाशी वाद होता का, कुणी मारलं का?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड आणि बीट अंमलदार राजू डोईफोडे यांनी सांगितले की, “सध्या अपमृत्यू नोंद करण्यात आली आहे. जालना येथील शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.”गावात शोककळा पसरली असून, कैलासच्या मृत्यूमागील सत्य काय आहे याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.
पत्रकार:विजय रणभोर, पुणे.
9359280220.







