मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने मुंबई-ठाणे जलमय; रेल्वे वाहतूक विस्कळीत, हवामान विभागाचा इशारा
मुंबई : उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात दमदार हजेरी लावली असून मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल रेल्वे सेवाही उशिराने धावत आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रात्रीभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे सेवांवर परिणाम झाला असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.
मुंबई महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मान्सूनच्या आगमनानंतर पुढील काही दिवस मुंबई महानगर क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








