टाकळीभानमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; प्रशासनाकडून एक महिन्याची मुदत.


टाकळीभानमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; प्रशासनाकडून एक महिन्याची मुदत.


टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असताना ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून चांगल्या प्रतीचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रीतसर परवानगी घेऊन बसवावा, तोपर्यंत विद्यमान पुतळा झाकून ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना केले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ६ मार्च २०२६ रोजी ग्रामस्थांच्या वतीने स्टँड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी बसविण्यात आला होता. याबाबत शासनाला माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून वेळोवेळी ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पुतळा हटविण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सकाळपासून गाव बंदचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनीही गाव बंदला प्रतिसाद दिला.
यानंतर पोलीस स्टेशनसमोर पोलीस प्रशासन, महसूल विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत सर्व संबंधितांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ग्रामस्थांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.
त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुतळ्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी आरती करून पुतळा झाकला.
प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर गावातील वातावरण निवळले असून गावातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत.

पत्रकार: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!