शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही; कोल्हापुरात सर्वपक्षीय मेळाव्यात निर्धार, ९ जूनला महामोर्चा
कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात शेतकरी आणि नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
यावेळी बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गाचा हा डाव मोडून काढण्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता रस्त्यावरची लढाई लढली जाणार आहे.
या विरोधाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या ९ जून रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विराट महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला विरोध दर्शवावा, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार -उमेश कुलकर्णी










