विठ्ठलाचे आषाढ महिन्यात ‘व्हीआयपी’ दर्शन बंद; सरकारचा ऐतिहासिक निर्णय
पंढरपूर:आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यावर्षी आषाढ महिन्यात विठ्ठलाचे ‘व्हीआयपी’ दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
वारकऱ्यांचा भक्तीमार्ग होणार सुखकर
दरवर्षी आषाढी वारीसाठी सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेकदा १५-१५ तास रांगेत उभे राहावे लागते. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य वारकऱ्यांच्या रांगेचा वेग मंदावतो आणि त्यांना तासनतास ताटकळत राहावे लागते. हीच अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता केवळ वारकरीच ‘व्हीआयपी’
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, नेत्यांचे आणि मान्यवरांचे व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे आता केवळ सामान्य वारकरीच खऱ्या अर्थाने ‘व्हीआयपी’ असतील. यामुळे दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकेल आणि वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने घेता येईल.
या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून मोठे स्वागत होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ‘विठ्ठलाच्या दारी सर्व समान’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548426










