पोलीस ठाण्यात, कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या एका इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर ११ एप्रिल रोजी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने पीडित तरुणी मानसिक तणावाखाली होती. याच निराशेतून तिने ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी पीडितेचा मृतदेह थेट करकंब पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा केली आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी ठिय्या मागे घेतला आणि रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीला कधी अटक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










