आषाढी वारीमुळे मतदार यादी पुनरीक्षण मोहीम पुढे ढकला; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी :महाराष्ट्रात ३० जून ते २१ जुलै दरम्यान मतदार यादी सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. मात्र, याच कालावधीत आषाढी वारी होत असल्याने ही मोहीम किमान महिनाभर पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र पाठवून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आषाढी वारीसाठी राज्यभरातील लाखो वारकरी आपल्या गावांबाहेर असतात. अशा परिस्थितीत पुनरीक्षण मोहिमेदरम्यान अनेक नागरिक घरी उपलब्ध नसल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
पंढरपूर वारी, पावसाळा आणि संभाव्य अतिवृष्टीचा विचार करून सर्वसामान्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी पुनरीक्षण मोहिमेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसने पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी,
9822548429










