दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली:-


दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली:-

दौंड:(मळद):दि. 2 जून :-दौंड तालुक्यातील मळद आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा कहर केला. या नैसर्गिक आपत्तीत मळद गावचे माजी सरपंच प्रदीप मुरलीधर साळवे यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभासाठी उभारलेला भव्य मंडप कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुडा समारंभ सुरू असतानाच हवामानात अचानक बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे मंडपाचा तोल जाऊन तो काही क्षणांतच कोसळला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र उपस्थितांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने सर्वजण सुखरूप बचावले.

वादळाच्या तीव्रतेमुळे गावातील अनेक विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे मळदसह परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वादळामुळे गावातील अनेक मोठी व जुनी झाडे कोसळली. काही ठिकाणी रस्ते अडवल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. मुसळधार पावसासोबत अल्प प्रमाणात गारांचाही वर्षाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, मळद गावाच्या इतिहासात इतक्या वेगाचा वादळी पाऊस यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही क्षणांतच झाडे आणि विजेचे खांब जमीनदोस्त झाले.

साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान एवढी मोठी दुर्घटना घडूनही कोणालाही दुखापत झाली नसल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून पडलेली झाडे हटविण्याचे तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!