मुंबई, प्रतिनिधी : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दूरदृष्टीच्या धोरणाअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आधुनिकीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटी महामंडळाचा संपूर्ण ताफा टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, २०४७ पर्यंत १०० टक्के एसटी बसेस इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या योजनेनुसार २०२९ पर्यंत एसटीच्या ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के आणि २०४७ पर्यंत संपूर्ण १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित केला जाणार आहे. यामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होणार आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ई-बसेसच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यभर आवश्यक चार्जिंग केंद्रांचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील एसटी आगारांच्या स्वच्छतेसाठीही आधुनिक यांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगारांची स्वच्छता अधिक प्रभावी आणि नियमितपणे राखली जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळ अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि प्रवासी-केंद्रित बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे मानले जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










