गणेशनगर परिसरात पुन्हा अपघात; गतीरोधकांच्या मागणीसाठी नागरिकांचा आक्रोश


गणेशनगर परिसरात पुन्हा अपघात; गतीरोधकांच्या मागणीसाठी नागरिकांचा आक्रोश

भोसरी-आळंदी रोडवरील गणेशनगर परिसरात वेगवान वाहनांमुळे अपघातांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गणेशनगर येथे राहणारे नागरिक बसस्टॉपवर उतरून रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
आजही अशीच एक गंभीर घटना घडली. बसस्टॉपवर उतरून रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्तीचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
स्थानिकांच्या मते, गणेशनगर परिसरात मंदिरे, दुकाने, भाजी विक्रेते आणि रहिवासी वसाहती असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता ओलांडणे धोकादायक बनले आहे.
वारंवार अपघात होत असूनही लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा गतीरोधक बसविण्याची, झेब्रा क्रॉसिंगची आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आजच्या अपघातानंतर नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गणेशनगर परिसरात गतीरोधक, पादचारी क्रॉसिंग व अन्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

पत्रकार विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!