नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनी सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात .


नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनी सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात :-

कल्याण:दि. 6 जून :-देशभरात चर्चेत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता कल्याणपर्यंत पोहोचली असून, या प्रकरणात कल्याणमधील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधित विद्यार्थिनीच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा जबाब नोंदवला. तपासादरम्यान आधीपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या एका विद्यार्थ्याच्या कॉल डिटेल्स आणि संपर्कांची छाननी करण्यात आली असता या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या निदर्शनास आला.

याच धाग्याच्या आधारे सीबीआयचे पथक कल्याणमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थिनीची सविस्तर चौकशी करण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी आणि संशयित विद्यार्थी यांच्यातील संपर्काचे स्वरूप काय होते, तसेच त्या संपर्काचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.

या संदर्भात विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या मुलीचा एका विद्यार्थ्यासोबत संपर्क होता आणि त्याच कारणामुळे तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीबीआय अधिकाऱ्यांनी घरी येऊन प्राथमिक चौकशी केल्याची पुष्टीही त्यांनी केली.

दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिची भूमिका केवळ संपर्कापुरती मर्यादित होती की पेपरफुटी रॅकेटशी तिचा कोणताही संबंध होता, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.

या चौकशीमुळे कल्याण परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगली असून, तपासातून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे  ,9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!