आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण:-
जि.अकोला:दि. 6 जून :-परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पुढाकारातून मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. अकोला लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख डॉ. राजन साळवी यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून या सेवेचे लोकार्पण केले. यावेळी “सेवा हीच आमची ओळख, काम बोलतंय कामं” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा अन्य आरोग्य केंद्रात पोहोचविण्यास या सेवेचा मोठा लाभ होणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन निलेश कापकर यांनी मोफत पाणीपुरवठा टँकर सेवाही सुरू केली आहे. या माध्यमातून परिसरातील विविध गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही कापकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने २४ तास सुरू राहणाऱ्या अभ्यासिका गावागावांत सुरू करण्याचा त्यांचा संकल्प आहे. स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
रस्ते, वीज, पाणी, शेती आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी निलेश कापकर यांनी सातत्याने जनआंदोलने उभारून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे परिसरात त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखा राऊत, युवासेना सचिव विठ्ठल सरप, जिल्हा समन्वयक प्रणव तायडे, उपजिल्हा प्रमुख उमेश भुसारी, युवासेना उपजिल्हा प्रमुख शंतनू पाटील, तालुका प्रमुख प्रकाश गिते, बाळू बघाडे, सपना नवले, शहरप्रमुख शीतल खंडाळकर, वर्षा गवळी, डॉ. सुनील आवटे, छत्रपती गाडवे, सागर लाड, काशीराम आडे, शंकर जाधव, विनोद चव्हाण, प्रेम जाधव, चोंढकर काका, बलक काका, गजानन डाखोरे, कदम भाऊ यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत रुग्णवाहिका सेवा, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून निलेश कापकर लोकसेवेचे कार्य अधिक व्यापक करत असल्याने त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे., 9359280220.










