लोहार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष; अधिवेशनात आझाद मैदानावर एल्गारचा इशारा

टाकळीभान प्रतिनिधी : अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था, पुणे यांच्या वतीने लोहार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग-व्यवसाय तसेच राजकीय विकासासाठी शासनाकडे वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि विविध मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, या मागण्यांची अद्याप अपेक्षित दखल घेतली नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
लोहार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
संस्थेने शासनाकडे सादर केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोहार समाजातील कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य व प्रतिनिधी म्हणून संधी देणे, विधान परिषदेवर लोहार समाजातील प्रतिनिधीची आमदार म्हणून नियुक्ती करणे, एनटी प्रवर्गातील अत्याचारग्रस्त कुटुंबांना नोकरीची तरतूद करणे, तसेच लोहार समाजासाठी मंजूर करण्यात आलेले ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी शस्त्रनिर्मिती व विविध कारागिरीद्वारे योगदान देणाऱ्या लोहार समाजातील शूरवीर, योद्धे आणि कारागिरांच्या इतिहासाची शासन दरबारी नोंद घेऊन त्यांचे साहित्य प्रकाशित करावे व राष्ट्रीय स्मारके उभारावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा शुल्क सवलत व आरक्षणाच्या लाभांसाठी उत्पन्न मर्यादेची अट रद्द करावी, जातीचा दाखला मिळविताना १९६५ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट हटवावी, तसेच कौशल्य विकास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि विविध व्यवसायांसाठी कर्जावरील ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
कारागीर व उद्योजकांना मशिनरी इक्विपमेंट टेस्टिंग सेंटर व कृषी महाविद्यालयांकडून मिळणारी चाचणी प्रमाणपत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे, भटक्या व विमुक्त जाती-जमातींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करणे आणि जन्माने लोहार असलेल्या पण इतर आडनावे लागलेल्या कुटुंबांचा भटक्या जमातीत समावेश करणे, या मागण्याही शासनाकडे प्रलंबित असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष कुमारभाऊ थोरात, कार्यवाह दिलीप वसव लोहार तसेच लोह क्रांती – एक विचारधारा सामाजिक चळवळचे संस्थापक संजयभाऊ कोळंबेकर यांनी शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत व लोहार समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पावसाळी अधिवेशनाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानावर लोहार समाजाचा मोठा एल्गार पुकारला जाईल, असा स्पष्ट इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर









