शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा


शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. “रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
मोर्चामध्ये हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार Raju Shetti तसेच काँग्रेस नेते Satej Patil यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलकांनी महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी शासनावर टीका करत सांगितले की, शेतकऱ्यांना नको असलेला महामार्ग त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ७३ ते ७६ गावांतील शेतकरी भूमिहीन होण्याची भीती असून सुपीक शेतीजमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मोर्चात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. “आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण आमच्या हक्काची जमीन आम्ही देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या ड्रोनद्वारे जमीन मोजणी प्रक्रियेलाही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. जमीन संपादन आणि मोजणीबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी ‘शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती’ तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विरोधाची लाट वाढत असून, येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!