प्रणित मोरेची कॉमेडी की विकृती? वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापाची लाट
मुंबई :
महिलांविषयी आक्षेपार्ह भाष्य आणि तथाकथित विनोदाच्या नावाखाली होत असलेल्या वक्तव्यांविरोधात समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान कॉमेडियन प्रणीत मोरे याने केल्याचा दावा करण्यात येत असलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्याचा निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि प्रतिक्रियांमध्ये महिलांच्या चारित्र्याची तुलना अन्नपदार्थाशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त करत नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कॉमेडीच्या नावाखाली महिलांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही,” अशी भूमिका अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून मांडली जात आहे.
काही नागरिकांनी अशा प्रकारच्या विनोदांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत संबंधित कलाकारांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारचे विनोद किंवा वक्तव्ये ‘कॉमेडी’ म्हणून खपवून घेणाऱ्या कलाकारांवर आणि त्यांच्या कार्यक्रमांवर समाजाने सामूहिकपणे बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. जोपर्यंत अशा व्यक्तींना मिळणारी प्रसिद्धी, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि सोशल मीडियावरील व्ह्यूज कमी होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
तसेच, सार्वजनिक मंचावर किंवा सोशल मीडियावर महिलांविषयी बोलताना सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी विद्यमान कायद्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. महिलांच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी किंवा त्यांचा अवमान करणारी वक्तव्ये करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कायद्याचा प्रभावी धाक निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या घटनांना आळा बसू शकतो, असे मतही अनेकांनी नोंदवले आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित वक्तव्याचा संपूर्ण संदर्भ, कार्यक्रमाचे स्वरूप आणि त्याबाबत प्रणीत मोरे यांची अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे सर्व बाजू समोर आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरेल, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
– पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९










