शंकर बरडे खून प्रकरणात आरोपींना मोठा झटका; पाचही जामीन अर्ज फेटाळले:-


शंकर बरडे खून प्रकरणात आरोपींना मोठा झटका; पाचही जामीन अर्ज फेटाळले:-

जि. बीड:ता. पाडळी :दि.13 जून :-पाडळी येथील भिल्ल समाजातील शंकर बरडे यांच्या गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. या निर्णयामुळे आरोपींना मोठा धक्का बसला असून मृत शंकर बरडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सूर्यकांत पवार यांनी प्रभावी आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद सादर केला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासादरम्यान समोर आलेले पुरावे, साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता तसेच आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या महत्त्वाच्या बाबी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

अ‍ॅड. पवार यांच्या सविस्तर युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने आरोपी नाना जाणू सरवदे , अंकुश गिर्जप्पा अवांतकर , अक्षय राजाभाऊ सरवदे , सोनाजी भिवसेना सरवदे आणि अशोक (पिनू ) सखाराम सरवदे या पाच आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे खून प्रकरणाच्या तपासाला आणि न्यायप्रक्रियेला महत्त्वपूर्ण बळ मिळाल्याचे मानले जात आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात न्यायालयाने घेतलेल्या या भूमिकेमुळे न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचे भिल्ल समाजासह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून फिर्यादी पक्षात समाधानाचे वातावरण आहे. पाडळी खून प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना आलेला हा निर्णय न्यायप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या सुनावणीवेळी अ‍ॅड. सुर्यकांत पवार यांना अ‍ॅड. शेख इम्रान , अ‍ॅड. पंकज रायभोळे , अ‍ॅड. शेख अन्वर तसेच इबात शेख यांनी सहकार्य केले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणाच्या पुढील सुनावण्यांकडे आणि तपासाच्या दिशेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!