शहादा येथे १४ व १५ जून रोजी दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी व साहित्य वाटप शिबिर:-


शहादा येथे १४ व १५ जून रोजी दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी व साहित्य वाटप शिबिर:-

जि.नंदुरबार:ता.शहादा:दि. 13 जून :-नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः शहादा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा समाज कल्याण कार्यालय व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती शहादा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी Vikas Rathod यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना विकास राठोड यांनी सांगितले की, रविवार दि. १४ जून व सोमवार दि. १५ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत शहादा येथील Hotel Jain Plaza येथे तालुकास्तरीय दिव्यांग आरोग्य तपासणी व साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे सहाय्यक साहित्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकूण १७ प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये लेग कॅलीपर, हँड कॅलीपर, जयपूर फूट, अंधकाठी, तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र तसेच इतर उपयुक्त साधनांचा समावेश आहे.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी स्वतःचे दिव्यांग ओळखपत्र आणि आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुक्यातील अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून नगरपालिका स्तरापर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शासकीय कर्मचारी गावोगावी जाऊन नागरिकांना शिबिराची माहिती देत आहेत.

हे शिबिर भगवान महावीर विकलंग सहायता समिती तसेच जयपूर फूट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आवश्यक साहित्य प्राप्त करावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी विकास राठोड यांनी केले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे 9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!