हवामान विभागाचा मोठा इशारा: पुढील ४८ तासांत १९ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता; कोकण-गोव्यातही अलर्ट


हवामान विभागाचा मोठा इशारा: पुढील ४८ तासांत १९ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता; कोकण-गोव्यातही अलर्ट

नवी दिल्ली : देशभरात मान्सूनने वेग घेतला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. कोकण-गोवा, बिहार, झारखंडसह देशातील १९ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची गती काहीशी मंदावली असली तरी देशाच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवसांत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो. काही भागांत वादळी वारे ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः कोकण-गोवा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सखल भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि पूर्व भारतातील काही राज्यांत मान्सूनची पुढील प्रगती वेगाने होत असल्याने तेथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा, वादळी वातावरणात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मच्छीमारांनीही समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील ४८ तास देशातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार असून प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!