६ खासदारांच्या बंडावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘एहसान फरामोश आणि विकाऊ सडकी वृत्ती’ अशी टीका
मुंबई : ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांनी या खासदारांना “एहसान फरामोश” आणि “विकाऊ सडकी वृत्तीचे” लोक असे संबोधत तीव्र शब्दांत टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष, शिवसैनिक आणि मतदारांच्या बळावर निवडून आलेल्या खासदारांनी आता त्यांच्याशीच गद्दारी केली आहे. जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात करून वैयक्तिक स्वार्थासाठी भूमिका बदलणे हे लोकशाहीला आणि मतदारांना दिलेला धोका असल्याचे त्यांनी म्हटले.
बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यामागे मतदारसंघातील विकासकामांचा खोळंबा, निधीची कमतरता आणि प्रशासनाकडून होणारा भेदभाव अशी कारणे दिली आहेत. मात्र, ही कारणे केवळ बहाणे असून सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणासाठी केलेले समर्थन असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटले की, काही लोकांनी स्वतःचा स्वाभिमान, निष्ठा आणि प्रतिष्ठा विकून राजकीय सोय निवडली आहे. अशा प्रवृत्तीविरोधात शिवसैनिक आणि जनतेच्या बळावर संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
. 9822548429








