महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; थेरगावच्या क्रांतीवीर नगरमध्ये महिनाभरापासून राडारोडा तसाच
थेरगाव :थेरगाव येथील क्रांतीवीर नगर परिसरातील संचेती शाळेजवळ महावितरणकडून भूमिगत वीज केबल कामासाठी सुमारे महिनाभरापूर्वी रस्ता खोदण्यात आला होता परंतु खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महावितरण व संबंधित कंत्राटदाराने खोदकामानंतर निर्माण झालेला माती, दगड आणि राडारोड्याचा ढीग रस्त्यालगतच सोडून दिला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, संचेती शाळेजवळील पदपथाशेजारी मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग साचलेला असून जमिनीखालून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज केबल्स उघड्या अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत या मार्गावर विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखादा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने उघड्या केबल्समुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढला आहे. तसेच राडारोडा मुळे विद्यार्थी व नागरिक घसरून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन राडारोडा हटवावा, उघड्या केबल्स सुरक्षित कराव्यात आणि रस्ता पूर्ववत करावा,” अशी मागणी क्रांतीवीर नगर परिसरातील नागरिक व पालकांकडून करण्यात येत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








