भिवंडीत पोलिसांची मोठी कारवाई: ॲमेझॉनच्या गोदामावर धाड, कालबाह्य अन्नपदार्थ बाजारात विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल
भिवंडी येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. च्या गोदामावर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर कालबाह्य (Expired) आणि मानवी वापरासाठी अयोग्य असलेले खराब अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियम आणि अटींनुसार हे खराब अन्नपदार्थ कायदेशीररीत्या नष्ट करणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी ते नष्ट न करता ग्राहकांची फसवणूक करून पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचे तपासणीत उघड झाले आहे.
या प्रकरणात प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी खोट्या कागदपत्रांचाही आधार घेण्यात आला. आर के ट्रेडर्सचे मालक रहमान आणि ॲमेझॉनचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर यांनी अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट लावल्याचे एक बनावट आणि खोटे प्रमाणपत्र (Destruction Certificate) सादर केल्याचाही आरोप आहे.
या संपूर्ण फसवणूक आणि हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत कोनगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या (FSSAI) विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पत्रकार सिंथिया कोरिया








