टिटवाळ्यात पाणीवादातून मराठी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी


टिटवाळ्यात पाणीवादातून मराठी कुटुंबावर जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

टिटवाळा (प्रतिनिधी):
ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील मोरया नगरी येथे पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या किरकोळ कारणावरून एका मराठी कुटुंबावर शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कारणावरून योगेश शिंदे आणि शेजारी सुनील भाटन यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र हा वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला. आरोपीनं आपल्या कुटुंबीयांसह योगेश शिंदे आणि त्यांच्या वृद्ध आईवर लोखंडी सळई व बांबूने हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शिंदे कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा निषेध करत, किरकोळ वादातून वाढत्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. “सामान्य कारणांवरून होत असलेले असे हल्ले समाजासाठी धोकादायक आहेत. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!