एकल महिलांच्या प्रश्नांबाबत पुरवठा विभाग असंवेदनशी

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, दत्तनगर, पढेगाव, अशोकनगर व शिरसगाव येथील शिधापत्रिका असूनही धान्य मिळत नसलेल्या एकल महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला भेट देण्यात आली. यावेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा एकल महिलांबाबत असंवेदनशीलपणा समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महिलांची नावे द्या, असे सांगणारे अधिकारी आज मात्र विविध कारणे देत आपली जबाबदारी झटकताना दिसल्याचे उपस्थितांनी सांगितले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनुसूचित जमातीतील एकल महिला वैशाली सोनवणे यांना शिधापत्रिका असूनही धान्य मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे वेळोवेळी पुरवठा विभागात जमा करण्याचा प्रयत्न केला, मात्र विभागाने ती स्वीकारली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्या आजपर्यंत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.
याचप्रमाणे अन्य काही एकल महिलांची नावे व माहितीची यादी आज पुरवठा विभागात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लाभ सुरू करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
एकल महिलांसाठीच्या २५ योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना व शिधापत्रिकेवरील अन्नधान्य योजना या दोन महत्त्वाच्या योजना मानल्या जातात. सरकार या योजनांबाबत संवेदनशील असताना संबंधित विभागातील अधिकारी मात्र नाकर्तेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गरजू महिलांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराबाबत मिशन वात्सल्य शासकीय समितीचे अशासकीय सदस्य बाळासाहेब जपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित महिलांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










