देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली; राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा


देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली; राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

​पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या जमिनींना धोका निर्माण करणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अशी आक्रमक भूमिका अष्टविनायक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतली आहे. पुण्यात आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत हा कायदा हिंदू मंदिरांची स्वायत्तता मोडीत काढण्याचे कारस्थान असल्याचे सांगत, सरकारने पाऊल मागे न घेतल्यास राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
​कायद्याला नेमका विरोध का?
अष्टविनायक मंदिर समितीच्या मते, ऐतिहासिक काळापासून मंदिरांना मिळालेल्या शेकडो एकर ‘इनाम’ जमिनी या कायद्यामुळे रद्द होऊन त्या खाजगी व्यक्तींच्या घशात जाण्याची भीती आहे.
​ऐतिहासिक वारसा म्हणून मिळालेल्या या जमिनींचे मालकी हक्क बदलल्यास तिथे व्यावसायिक मॉल्स किंवा हॉटेल्स उभी राहतील.
​उत्पन्नाचे मूळ साधन नष्ट झाल्यामुळे भविष्यात ही देवस्थाने शासकीय अनुदानावर परावलंबी आणि हतबल होतील, अशी भीती विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.
​१ जानेवारी २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना थेट मालकी हक्क देणे म्हणजे देवस्थानच्या मालमत्तेची कायदेशीर लूट असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
​सरकारी दुजाभावाचा आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विद्वांस आणि बल्लाळेश्वर देवस्थानचे जितेंद्र गद्रे यांनी सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. वक्फ बोर्डाच्या जमिनींना या कायद्यातून पूर्णपणे वगळून केवळ हिंदू मंदिरांच्या जमिनींचे ‘निर्मूलन’ करणे, हे संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महसूल अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही, ही तरतूद लोकशाहीविरोधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
​मंदिरांच्या प्रमुख मागण्या:
१. हा जाचक मसुदा कोणत्याही अटीशिवाय त्वरित व कायमचा रद्द करावा.
२. हरकती नोंदवण्याची मुदत किमान दोन महिन्यांनी वाढवून मिळावी.
३. गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर ‘जमीन बळकाव प्रतिबंधक कायदा’ लागू करावा.
४. ७/१२ उताऱ्यावर ‘देवस्थान जमीन: प्रतिबंधित सत्ता प्रकार’ अशी स्पष्ट नोंद करावी.
​या पत्रकार परिषदेला केशव विद्वांस (चिंचवड), जितेंद्र गद्रे व वैभव आपटे (पाली), बाळकृष्ण कवडे (ओझर), किरण काशीकर (महड) आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुनील घनवट उपस्थित होते. भाविकांच्या भावना पायदळी तुडवल्यास कोट्यवधी गणेशभक्तांना सोबत घेऊन तीव्र लढा उभारला जाईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!