ब्रेमन चौकात वाहतूक कोंडीचा फटका पादचाऱ्यांना; फुटपाथवरून दुचाकींची सर्रास वाहतूक, कारवाईची मागणी


ब्रेमन चौकात वाहतूक कोंडीचा फटका पादचाऱ्यांना; फुटपाथवरून दुचाकींची सर्रास वाहतूक, कारवाईची मागणी

औंध : ब्रेमन चौक परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक दुचाकीस्वार थेट फुटपाथचा वापर करत असल्याचे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे काही दुचाकीस्वार नियम धाब्यावर बसवत पादचारी मार्गावरून वाहने चालवत आहेत. फुटपाथवर वाहने येऊ नयेत यासाठी प्रशासनाने काही ठिकाणी सुरक्षा खांब बसवले असले तरी दुचाकीस्वार खांबांच्या मधून किंवा बाजूने मार्ग काढून वेगाने पुढे जात आहेत.
पादचारी मार्गावरून दुचाकींच्या रांगा लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. पादचाऱ्यांच्या अगदी जवळून वाहने जात असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेकांना फुटपाथ असूनही रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे पुरेसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. चौकात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपस्थित असतानाही फुटपाथवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागरिकांनी प्रशासन आणि वाहतूक विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन फुटपाथवरील अतिक्रमणासारखीच बेकायदेशीर वाहन वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नागरिकांचा सवाल
“पादचाऱ्यांसाठी बांधलेला फुटपाथ जर वाहनांसाठीच वापरला जाणार असेल, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?”

पत्रकार उमेश कुलकर्णी.
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!