कळमनुरी खून प्रकरणातील फरार दोन आरोपी जेरबंद:-
जि.हिंगोली. ता.कळमनुरी. दि. 1 जून :-कळमनुरी : येथील साईनगर परिसरात २२ मे रोजी रात्री एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेल्या प्रकरणातील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही कारवाई केली.
साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाचा निघृणपणे खून केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. मात्र दोन मुख्य आरोपी फरार होते.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वाशिम-अकोला महामार्गावरून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन वाशिम जिल्ह्यात महामार्गावर तातडीने नाकाबंदी केली. जवळपास पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर आरोपी आकाश विठ्ठल सातव (वय २८) आणि भरत शंकरलाल यादव (वय २५) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, फौजदार माधव जिवारे तसेच गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जाल्मिरे, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे, मारोती काकडे यांच्या पथकाने केली.
पत्रकार: विजय रणभोर, पुणे.
9359280220.










