जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा- खामगाव रेल्वे मार्गाची


जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा- खामगाव रेल्वे मार्गाची मागणी

पिंपळगाव रेणुकाई-पारध-धाड मार्गे रेल्वे सुविधा झाल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना : सामाजिक कार्यकर्ते -महेंद्र बेराड

भोकरदन /प्रतिनिधी — मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव तसेच मराठवाडा आणि खानदेशला जोडणाऱ्या जालना-जळगाव रेल्वे मार्गासोबत भोकरदन-बुलढाणा-खामगाव ते थेट मलकापूर पर्यंत असा स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा रेल्वेमार्ग निर्माण करण्यात यावा, तसेच हा रेल्वे मार्ग भोकरदन, पिंपळगाव रेणुकाई,पारध शाहूराजे, धाड, दुधा आणि बुलढाणा मार्गे नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी पारध शाहूराजे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी शासन व रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महेंद्र बेराड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना, भोकरदन, बुलढाणा, खामगाव, आणि परिसरातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. या भागात मिरची,मका, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, तूर आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, योग्य आणि स्वस्त वाहतूक सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना मोठा आर्थिक फटका बसतो.
सध्या शेतमाल ट्रक किंवा खासगी वाहनांद्वारे वाहतूक करावी लागत असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल राज्यातील तसेच देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.
प्रस्तावित भोकरदन–बुलढाणा–खामगाव रेल्वे मार्गाचे एकूण अंदाजे अंतर सुमारे 130 किलोमीटर दरम्यान राहू शकते. तर जालना ते भोकरदन मार्गे बुलढाणा आणि पुढे खामगाव असा रेल्वे संपर्क निर्माण झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल.
या रेल्वे मार्गाचा सर्वात मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचेही महेंद्र बेराड यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, जळगाव आणि इतर शहरांमध्ये जातात. सध्या बससेवा अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना वेळ आणि पैशांचा मोठा खर्च सहन करावा लागतो. रेल्वे मार्ग सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित, जलद आणि कमी खर्चात प्रवास करता येणार आहे.
व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता या रेल्वे मार्गामुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना मिळू शकते. कृषी प्रक्रिया उद्योग, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, धान्य बाजार, कापूस प्रक्रिया उद्योग आणि इतर लघुउद्योगांना वाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होईल. परिणामी स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढेल आणि ग्रामीण युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत मिळेल.
महेंद्र बेराड यांनी पुढे सांगितले की, पारध शाहूराजे, धाड, पिंपळगाव रेणुकाई आणि भोकरदन परिसरातील नागरिकांनी या मागणीला मोठा पाठिंबा दिला आहे. रेल्वे मार्गामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा विकसित होतील, पर्यटनाला चालना मिळेल आणि आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होण्यास मदत मिळेल.
मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीनही विभागांना थेट रेल्वेने जोडण्याची क्षमता या मार्गात असल्याने शासनाने या प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करून तातडीने सर्वेक्षण व पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी केली आहे. लवकरच या महत्त्वाच्या प्रश्नसंदर्भात ते रेल्वे संघर्ष समिती स्थापन करणार असून या माध्यमातून भोकरदन आणि बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना याबाबत निवेदन देणार आहेत.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी भोकरदन–बुलढाणा–खामगाव रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या भोकरदन तालुक्यातील शेतकरी नागरिक बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव,धाड,मासरूळ,दुधा पिंपळगाव सैलानी आणि खामगाव परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

प्रतिनिधी मेहंद्र बेराड


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!