भारती आमराव महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

पिंपळे गुरव (पुणे) प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पिंपळे गुरव येथील भारती रेखा देवकर आमराव यांना नुकताच ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
भारती आमराव यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण प्रसार, सामाजिक जनजागृती तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सेवाभावी वृत्तीमुळे समाजात त्यांना विशेष मान व आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.
हा सन्मान संगमनेर येथील तेजस सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रविंद्र घोसाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना भारती आमराव यांनी समाजसेवेची वाट अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, विविध सामाजिक संस्था तसेच पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ पुणे,







