खाकीतील माणुसकीचा हृदयस्पर्शी अनुभव! वानवडी वाहतूक पोलिसांनी विद्यार्थिनीचे वाचवले नीटचे वर्ष
पुणे :
नीट परीक्षेसाठी साताऱ्याहून पुण्यात आलेल्या एका विद्यार्थिनीला परीक्षा केंद्राबाबत झालेल्या गैरसमजामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. मात्र, वानवडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे तिचे संपूर्ण वर्ष वाचले. पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत सायरन वाजवत तिला योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचवून वेळेत प्रवेश मिळवून दिला.
समृद्धी जगताप ही विद्यार्थिनी नीट परीक्षेसाठी पुण्यात आली होती. परीक्षा केंद्राबाबत गैरसमज झाल्याने ती लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात पोहोचली. मात्र, तिचे प्रत्यक्ष परीक्षा केंद्र कॅम्प परिसरातील सदर्न कमांड येथे असल्याचे समोर आले. प्रवेशासाठी अवघा पाच मिनिटांचा कालावधी शिल्लक असल्याने ती अत्यंत चिंताग्रस्त झाली होती.
यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले वानवडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर आणि चालक नामदेव बंडगर यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता समृद्धीला शासकीय वाहनात बसवले आणि सायरन वाजवत वाहतुकीतून मार्ग काढत अवघ्या पाच मिनिटांत सदर्न कमांड येथील परीक्षा केंद्रावर पोहोचवले.
वाहतूक पोलिसांच्या या तत्पर आणि मानवतावादी कृतीमुळे समृद्धीला वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला आणि तिचे वर्ष वाचले. खाकी वर्दीतील या माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “पोलीस म्हणजे केवळ कायद्याचे रक्षक नव्हे तर संकटसमयी धावून येणारे आधारवड” असल्याची भावना या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी






