वाचन संस्कारातून घडले समाजाभिमुख नेतृत्व; बापू सूत्रधार बोरसे यांचा प्रेरणादायी प्रवास
जळगाव प्रतिनिधी : वाचन, विचार आणि समाजसेवा यांची सांगड घालत युवकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारे बापू सूत्रधार बोरसे हे आज समाजात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत. साध्या कुटुंबातून पुढे आलेल्या बोरसे यांनी स्वतःच्या जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लहानपणापासूनच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या वडिलांनी वर्तमानपत्रातील अग्रलेख मोठ्याने वाचण्याची सवय लावल्याने त्यांचे विचारविश्व विस्तारले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या वडिलांनी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली. “शिक्षण हीच आपली खरी शेती आहे” हा त्यांचा विचार बापू बोरसे यांच्या आयुष्याचा आधार ठरला.
याच संस्कारांतून पुढे सुमनसूत्र वाचनालय व ग्रंथालय उभे राहिले. या ग्रंथालयात दहा हजारांहून अधिक ग्रंथांचा संग्रह असून त्यातील बहुतांश साहित्य बुद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित आहे. स्वतःच्या खर्चातून उभारलेले हे ग्रंथालय सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
व्यावसायिक जीवनात बोरसे यांनी १८ मार्च १९९५ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेत लिपिक म्हणून सेवेला सुरुवात केली. आपल्या कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत मजल मारली. बँकिंग क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग त्यांनी युवकांना उद्योजकतेचे मार्गदर्शन करण्यासाठी केला.
१८ मे २००० रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी नाशिक येथील त्रिरश्मी लेणी परिसरातून त्यांनी सामाजिक कार्याला नवी दिशा दिली. तेव्हापासून महाराष्ट्रभर युवकांना उद्योग, शेती, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रातील संधींबाबत स्वखर्चाने मार्गदर्शन करत आहेत. युवकांनी स्वावलंबी व्हावे आणि रोजगारनिर्माते बनावे, हा त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे.
याच ध्येयातून त्यांनी थर्टी सिक्स चेंबर या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून बौद्ध उद्योजक मेळावे, उद्योग प्रशिक्षण शिबिरे आणि “सम्यक जीविका” आधारित निवासी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून अनेक युवकांना उद्योजकतेची प्रेरणा मिळाली आहे.
बोरसे हे सुमनसूत्र ग्रुप, सुमनसूत्र अॅग्रो इंडस्ट्री आणि सुमनसूत्र अॅग्रो फार्मर प्रोड्युस कंपनी यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे कार्यही करत आहेत. समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकारी तत्त्वावर उद्योग उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी २०२२ मध्ये “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे नाशिक, भुसावळ आणि जळगाव येथे मोफत वितरण केले. या उपक्रमामुळे बौद्ध विचारांचा प्रसार होण्यास मदत झाली.
समाजातील बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले बापू सूत्रधार बोरसे हे आज एक विचारवंत, समाजसेवक आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या कार्यातून स्वावलंबन, शिक्षण, समता आणि सामाजिक जागृतीचा संदेश समाजात पोहोचत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.








