निष्पाप मुलाच्या रक्ताची किंमत समाजाने विसरता कामा नये,:पृथ्वीराज(भैय्या)पवार
जि. सांगली: दि. 12 जून :-सांगली शहरात अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या घटनेनंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या आपल्या भूमिकेत त्यांनी सांगलीत कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाईची गरज असल्याचे म्हटले आहे.
पृथ्वीराज पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “१३ वर्षांच्या निष्पाप बालकाच्या डोक्यात गोळी घालण्याइतकी गुंडांची हिंमत वाढली असेल, तर ही केवळ एक घटना नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कायद्याचा धाक संपला की गुन्हेगार मोकाट फिरतात आणि सामान्य नागरिक भीतीच्या छायेत जगू लागतात.”
त्यांनी प्रशासनाला आवाहन करताना म्हटले आहे की, गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचे राजकीय, आर्थिक किंवा इतर संरक्षण न देता त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर आणि तातडीची कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या जीविताचे रक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत, कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करावा आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“निष्पाप मुलांच्या रक्ताची किंमत समाजाने विसरता कामा नये. आता शांतता, सुरक्षितता आणि न्याय यासाठी ठोस कृतीची वेळ आली आहे,” असे मत पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले.
या भूमिकेमुळे सांगलीतील कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकार :-विजय रणभोर, पुणे.
9359280220.




