परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी:-


परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी:-

जि. परभणी,ता.मानवत:दि. 20 जून :-परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हनुमान मंदिराच्या परिसरातील मंडपाचे छत अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवार निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनासाठी परिसरातील तसेच बाहेरील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक मंडपाचे छत कोसळल्याने मंडपाखाली बसलेले अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रघुनाथ धगे यांनी तात्काळ पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयासह इतर जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.

दरम्यान, मृत आणि जखमींची अधिकृत यादी जाहीर करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरातील बांधकाम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!