शेअर बाजारातील कोट्यवधींच्या नुकसानीनंतर टोकाचे पाऊल? बार्शीत मुख्याध्यापकासह कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
सोलापूर :बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. मुख्याध्यापक योगेश पाटील, त्यांची पत्नी माधुरी पाटील तसेच अथर्व आणि शिवांश या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांना २२ पानांची कथित सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. योगेश पाटील यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती आणि त्यामध्ये सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि प्राथमिक तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांकडून सुसाईड नोटची सत्यता, आर्थिक व्यवहार तसेच इतर सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे हत्तीज गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर अशी वेळ आल्याने नागरिकांमध्येही दुःखाचे वातावरण आहे.
दरम्यान, पोलिस तपास सुरू असल्याने घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती येणे अद्याप बाकी आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्ये स्पष्ट होणार आहेत.
पत्रकार : उमेश कुलकर्णी मो. 9822548429




