खासदार विशाल पाटील यांची कायदा व सुव्यवस्थेवर घणाघाती टीका :-


खासदार विशाल पाटील यांची कायदा व सुव्यवस्थेवर घणाघाती टीका :-

सांगली : दि. 15 जून :-जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या आणि पोलीस ठाण्यांतील कारभार हा भ्रष्ट व्यवस्थेच्या विळख्यात अडकल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार पाटील म्हणाले, “आज सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांनाही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत स्वतंत्र अधिकार उरलेले नाहीत. कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नेमायचे हे वरच्या पातळीवर ठरते. त्यासाठी दरपत्रक निश्चित झाले असून लाखो-कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहेत.”

यापुढे बोलताना त्यांनी राजकीय हस्तक्षेपाचाही मुद्दा उपस्थित केला. “अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गुणवत्तेच्या आधारावर नव्हे, तर शिफारसी आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे होत असतील, तर कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलीस ठाण्यांमध्ये वसुलीची साखळी कार्यरत असल्याचा आरोप करताना त्यांनी म्हटले की, “प्रत्येक ठिकाणी ठराविक पद्धतीने पैसे गोळा केले जातात आणि त्याचे वाटप विविध स्तरांवर केले जाते, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा जनतेच्या सुरक्षेपेक्षा आर्थिक व्यवहारांमध्ये अडकली असल्याची भावना निर्माण झाली आहे.”

जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या आरोपांची गंभीर दखल घेऊन पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा राजकीय आणि आर्थिक दबावापासून मुक्त असणे आवश्यक असल्याचे मतही खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार पाटील यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, बदली प्रक्रिया आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय व प्रशासकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9350280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!