टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही :– कैलास सोमुसे.


टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही :– कैलास सोमुसे.

जि.लातूर,ता.जळकोट:दि. 15 जून :-विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी. (Transfer Certificate) देण्यासाठी पैसे मागणे किंवा टी.सी. देण्यास टाळाटाळ करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला असून अशा शाळांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष कैलास सोमुसे यांनी दिला आहे.

कैलास सोमुसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अनेक विद्यार्थी व पालकांकडून टी.सी. देण्यासाठी अवैधरित्या पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही शाळांकडून विविध कारणे सांगत विद्यार्थ्यांना टी.सी. देण्यास नकार दिला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या संबंधित शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय टी.सी. उपलब्ध करून देणे ही शाळांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने टी.सी. देण्यासाठी पैसे मागितल्यास किंवा टी.सी. देण्यास नकार दिल्यास विद्यार्थी व पालकांनी संबंधित शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव आणि संपूर्ण माहिती मोबाईल क्रमांक 8459355911 वर संपर्क साधून कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असे सोमुसे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढा सुरूच राहील आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तसेच विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन अशा गैरप्रकारांविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!