स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमध्ये तीव्र संताप; १७ जूनला ‘बदलापूर बंद’ तर उद्यापासून पाणीत्यागासह कडक उपोषण सुरू
बदलापूर:
महावितरण कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात बदलापूर शहरात नागरिकांचा आणि विविध संघटनांचा संताप अनावर झाला आहे. या सक्तीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध करण्यासाठी आज, १७ जून २०२६ रोजी ‘बदलापूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला शहरातील विविध संघटना, रिक्षा चालक-मालक, व्यापारी तसेच वीज ग्राहकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
’स्मार्ट मीटर नकोच’ अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी एकत्र येत जनआंदोलन उभारले आहे. या आंदोलनाची तीव्रता वाढवत उद्या म्हणजेच १८ जून २०२६ पासून बेमुदत कडक उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणादरम्यान आंदोलनकर्ते पाण्याचाही त्याग करणार आहेत.
पाऊस, उन्हाची तमा न बाळगता जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उपोषण आणि जनआंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. “आपल्या हक्कासाठी आता संघर्ष आणखी तीव्र करा, घर आणि कामा व्यवसायातून बाहेर पडा आणि जनआंदोलनात सहभागी व्हा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे बदलापूरमधील वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी ७९७२०४४३१० आणि ७७९८००५५५५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429





