महिलांच्या डब्यात प्रवास महागला! पुरुष प्रवाशांवरील दंड थेट २,५०० रुपये; विनातिकीट प्रवासालाही मोठा दणका
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने रेल्वे प्रवासासंदर्भातील नियम अधिक कठोर करत महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांवरील दंडात तब्बल पाचपट वाढ केली आहे. यापूर्वी ५०० रुपये असलेला दंड आता २,५०० रुपये करण्यात आला असून हा नवीन नियम २० जून २०२६ पासून लागू झाला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, महिला प्रवाशांची सुरक्षा, सोय आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या पुरुषांवर आता अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे.
यासोबतच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरील दंडही दुप्पट करण्यात आला आहे. रेल्वे महसूल वाढवणे, नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि प्रवाशांमध्ये शिस्त निर्माण करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
रेल्वेने प्रवाशांना नव्या नियमांची माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन आणि संबंधित डब्यांच्या नियमांचे पालन करूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी







