जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली; खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात


जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली; खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात

जत : जत तालुक्यामध्ये दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असून, यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके जळून खाक झाली आहेत, तर दुसरीकडे पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने जनावरांचा सांभाळ कसा करावा,असा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. तसेच, हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही पशुपालक आपल्या गायी-म्हशींना शेजारील कर्नाटक सीमाभागात घेऊन जाण्याचा विचार करत आहेत, तर काहींना नाईलाजास्तव आपली जनावरे विकावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची आणि ‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी जतच्या दुष्काळी भागातील तलावांमध्ये सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन करणे गरजेचे आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, चारा छावण्यांची उभारणी आणि बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीची आर्थिक मदत देणे यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळी तोंडावर आलेली असताना शेतीतून हाती काहीच न आल्याने शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा होणार,अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी :- संजय कोळी.वळसंग.
७८७५९०३७७७.


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!