कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘आपटा-कांचन’ तोडीवरील निर्बंधांवर सकल हिंदू समाजाचा आक्रमक पवित्रा; नोटिस मागे न घेतल्यास घेरावाचा इशारा
कोल्हापूर:
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने आपटा आणि कांचन वृक्षांच्या फांद्या व पानांच्या तोडीवर निर्बंध आणणारी जाहीर नोटीस काढली आहे. या नोटीशीवरून आता मोठा वाद निर्माण झाला असून, सकल हिंदू समाज, कोल्हापूरच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या या भूमिकेला ‘हिंदू-विरोधी फतवा’ असे संबोधत, हा आदेश तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
महानगरपालिकेच्या या नोटीशीवर आक्षेप घेताना सकल हिंदू समाजाने म्हटले आहे की, दसऱ्याच्या सणाला सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेनुसार आपटा आणि कांचनाची पाने लुटण्याचे महत्त्व आहे. यावरच निर्बंध लादणे चुकीचे आहे. तसेच, इतर सण-उत्सवांच्या वेळी अशाप्रकारचे नियम का लागू केले जात नाहीत, असा सवाल करत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सकल हिंदू समाजाने स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने ही जाहीर नोटीस त्वरित मागे घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करत कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घातला जाईल. या प्रकरणी आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९






