पोलीस दलामध्ये बदल्यांचे वारे; नेत्यांनी फोन केल्यास कारवाई
जालना जिल्हा पोलीस दलात वार्षिक सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी राजकीय किंवा बाह्य दबाव टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
बदलीसाठी इच्छुक पोलीस अंमलदारांना पसंतीची तीन ठिकाणे नमूद करून अर्ज सादर करण्यासाठी १८ मे ही अंतिम मुदत होती. ३१ मे २०२६ पर्यंत एका ठिकाणी सलग पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.
दरम्यान, ज्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे, निलंबनानंतर नुकतेच सेवेत रुजू झाले आहेत किंवा बेशिस्त वर्तनामुळे बदली झाली आहे, अशांच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बदली प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्याचे स्वतःचे गाव ज्या तालुक्यात येते, त्या ठिकाणी बदली दिली जाणार नाही. तसेच, एका तालुक्यात १२ वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी पुन्हा संधी मिळणार नाही. याशिवाय, ज्या पोलीस ठाण्यात आधीच पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी पुन्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेला कोणताही कर्मचारी अर्जापासून वंचित राहू नये, याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाणे व शाखा प्रमुखांवर सोपवण्यात आली असून, सर्व अर्ज एकत्रित करून आस्थापना शाखेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









