कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकार करणार थेट कांदा खरेदी
सातारा: कांद्याचे दर कोसळल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार आता स्वतः थेट कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात केली आहे.
१२ रुपये ३५ पैशांनी खरेदी सुरू
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची माहिती दिली. आता १२ रुपये ३५ पैसे दराने सरकारी पातळीवर कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. बाजारभावात कांद्याचे दर घटल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, त्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे.
आंदोलनानंतर सरकारची दखल
गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी आंदोलने केली होती. या आंदोलनांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने तातडीने हा खरेदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बाजार समितीमधील दरांवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










