नीट परीक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पुढील वर्षापासून परीक्षा होणार संगणक-आधारित
नवी दिल्ली:
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट (NEET UG) परीक्षेबाबत केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून ही परीक्षा पारंपारिक ओएमआर (OMR) शीटऐवजी पूर्णपणे संगणक-आधारित (Computer-based) पद्धतीने घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
नुकत्याच ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले होते. या गैरप्रकारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. ही परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, पारदर्शकतेसाठी आणि भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने आता परीक्षेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या विद्यार्थ्यांची ३ मे रोजीची परीक्षा रद्द झाली आहे, त्यांच्यासाठी आता २१ जून रोजी पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत काही संशयितांना अटकही करण्यात आली आहे.
डिजिटल क्रांतीकडे पाऊल टाकत, आता वैद्यकीय क्षेत्रातील ही मोठी प्रवेश परीक्षा हाय-टेक होणार असून यामुळे निकाल प्रक्रियेतही अधिक अचूकता आणि वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










