रेल्वे तिकीट व्यवस्थेवर प्रवाशांचा संताप; “आधी बुकिंग करणाऱ्यांनाच प्राधान्य द्या”


रेल्वे तिकीट व्यवस्थेवर प्रवाशांचा संताप; “आधी बुकिंग करणाऱ्यांनाच प्राधान्य द्या”

भारतीय रेल्वे च्या तिकीट आरक्षण व्यवस्थेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे की, दोन-दोन महिने आधी तिकीट बुक करूनही कन्फर्म तिकीट मिळत नाही, मात्र प्रवासाच्या एक दिवस आधी तात्काळ योजनेत जास्त पैसे भरल्यास तिकीट उपलब्ध होते. त्यामुळे ही व्यवस्था सामान्य प्रवाशांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे.
प्रवाशांच्या मते, “जे प्रवासी दोन महिने आधी नियोजन करून तिकीट काढतात, त्यांनाच सर्वप्रथम कन्फर्म जागा मिळायला हवी. पण प्रत्यक्षात वेटिंग आणि RAC मिळते, तर तात्काळमध्ये अतिरिक्त पैसे भरून कन्फर्म तिकीट मिळते. त्यामुळे सामान्य प्रवाशांवर अन्याय होत असून ही व्यवस्था कायदेशीर काळाबाजारासारखी वाटते.”
RAC व्यवस्थेमुळेही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्ण स्लीपरचे पैसे भरूनही दोन प्रवाशांना एकाच सीटवर बसून प्रवास करावा लागतो. १० ते १२ तासांचा प्रवास अर्ध्या सीटवर करणे अत्यंत गैरसोयीचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाढती प्रवासी संख्या, अपुऱ्या गाड्या आणि मर्यादित आरक्षण व्यवस्था यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसांत सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे अधिक कठीण बनते.
प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तात्काळ कोट्याचे पुनर्मूल्यांकन, अतिरिक्त डबे वाढवणे आणि दोन महिने आधी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्याने कन्फर्म जागा देण्याची मागणी केली आहे. आरक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!