अकरावी प्रवेशासाठी मोठा दिलासा! गुणपत्रक व एलसी नसतानाही मिळणार प्रवेश
मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवेशासाठी मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) सादर करण्याची सक्ती महाविद्यालयांना करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत सूचना जारी केल्या आहेत. या निर्णयामुळे कागदपत्रे मिळण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.
नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांकडे मूळ गुणपत्रक किंवा एलसी उपलब्ध नसल्यास ते हमीपत्र (Undertaking) सादर करून अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतील. त्यामुळे निकालानंतर कागदपत्रे मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा प्रवेशावर परिणाम होणार नाही.
तथापि, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने दिलेल्या मुदतीत मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. निर्धारित कालावधीत कागदपत्रे जमा न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429










