मुंबईत उबर चालकाकडून महिला प्रवाशाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच कंपनीची कारवाई
मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी ते नेरळ प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाला उबर चालकाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याच्या रकमेसंदर्भात झालेल्या वादातून चालकाने महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासासाठी निश्चित झालेल्या ५०९ रुपयांव्यतिरिक्त चालकाने आणखी ४० रुपये देण्याची मागणी केली. मात्र महिला प्रवाशाने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चालक संतापला. यानंतर त्याने गाडी लॉक करून महिलेला धमकावण्याचा प्रयत्न केला तसेच तिला थप्पड मारल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर संबंधित महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. प्रकरणाची गंभीर दखल घेत उबर कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित चालकाविरोधात कंपनीच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ऑनलाइन कॅब सेवांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429









